ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड; मी प्रहार संघटनेचा माणूस असं सांगत महिलांना धमक्या…घटना CCTV त कैद..!

      
             पुरंदर रिपोर्टर Live 

भोर | प्रतिनिधी

                           भोर तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांची चौकशी करत आलेल्या एका व्यक्तीने अचानक गोंधळ घालत कार्यालयात तोडफोड केल्याची घटना शनिवारी (७ जुलै २०२५) दुपारी घडली. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


                आरोपी हनुमंत मंगेश शिंदे (रा. देगाव नायगाव, ता. भोर) याने ग्रामसेवक विजय कुलकर्णी यांचा शोध घेत महिला कर्मचाऱ्यांना प्रश्नांच्या भडिमारात अडचणीत टाकले. कार्यालयात उपस्थित असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना आरोपीने “ग्रामसेवक कुठे आहेत?”, “रावसाहेब नसरापूरमध्ये कधी असतात?” असे आक्रमक प्रश्न विचारून दमदाटी केली.

 

🔘 पहा CCTV व्हिडिओ 👇👇





                   त्यानंतर संतप्त अवस्थेत आरोपीने ग्रामसेवकाच्या टेबलावरील काचेची वस्तू उचलून जमिनीवर फेकून फोडली. या दरम्यान, कर्मचारी रुपेश रवींद्र ओहाळ यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने शिवीगाळ करत मोठ्याने ओरडत सांगितले, “मी प्रहार संघटनेचा माणूस आहे, काहीही करू शकतो. लक्षात ठेवा, तुम्हाला काम करून देणार नाही.”


या घटनेमुळे ग्रामपंचायतीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या प्रकरणाचा तपास राजगड पोलीस करत असून आरोपीविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.





Post a Comment

0 Comments